मुंबई : लोकलमधील प्रवाशाने लाथ मारल्यामुळे रेल्वे रुळांची देखभाल करणाऱ्या ट्रॅक टेक्निशियनला जीव गमवावा लागला. मुंबईतील पश्चिम रेल्वेवर महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला.


47 वर्षीय श्रवण सानप आठ सहकाऱ्यांसोबत ड्युटीवर होते. त्यावेळी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील एका टवाळ प्रवाशाने सानप यांना लाथ मारली. त्यामुळे पडून डोकं आपटल्याने सानप यांचा मृत्यू झाला.

'दुरुस्ती होत असलेल्या रुळांजवळ ट्रेन पोहचत असल्याचं दिसताच पर्यवेक्षकाने शिटी वाजवली. शिटी ऐकून सावध झालेले सहा कर्मचारी ट्रेनच्या एका बाजूला गेले, तर सानप आणि नामदेव आव्हाड नावाचा सहकारी दुसऱ्या बाजूला' असं पश्चिम रेल्वेवरील अधिकाऱ्याने सांगितलं.

'लाथ बसल्यामुळे सानप यांचा तोल गेला आणि त्यांचं डोकं ट्रेनच्या फूटबोर्डखाली असलेल्या इमर्जन्सी स्टेप्सवर आदळलं.' अशी माहिती सानप यांचे सहकारी नामदेव आव्हाड यांनी दिली.

सानप यांना तात्काळ महालक्ष्मी स्थानकावर नेण्यात आलं. तिथे 108 क्रमांकाची अॅम्ब्युलन्स पार्क होती, मात्र चालक किंवा डॉक्टर नव्हता. त्यामुळे सानप यांना मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

जीआरपीने आपला जबाब नोंदवण्यास नकार दिल्याचा दावा आव्हाड यांनी केला. 'जीआरपीला फक्त मोटरमनचा जबाब हवा होता. मात्र ट्रेनच्या समोर घडणाऱ्या अपघातांविषयीच मोटरमनला माहिती असते. सानप हे अपघातावेळी मोटरमनच्या तीन कोच मागे होते.' असं नामदेव आव्हाड यांनी सांगितलं. पश्चिम रेल्वे टवाळ प्रवाशाला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासणार आहे.