मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर, नवी मुंबई, कळंबोली परिसर हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  मराठा आरक्षणाची मागणी करत काल दुपारी 12 वाजल्यापासून नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. कळंबोलीत मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. मराठा आंदोलनताली कार्यकर्त्यांकडून पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी जोरदार दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधाराचा वापर करावा लागला. सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी खारघर परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. तसे मेसेज कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत.


सरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही इंटरनेट वापरु शकणार नाही. सरकारकडून पुन्हा सूचना मिळाल्यानंतर तुमची इंटरनेट सेवा पूर्ववत होईल, असे मेसेज मोबाईल/इंटरनेट कंपन्यांकडून पाठवण्यात आले आहेत.

मुंबई बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मंगळवारी 25 जुलैला आर्थिक राजधानी मुंबई ठप्प झाली होती. काल सकाळी मुंबईत सुरु झालेलं आंदोलन मराठा संघटनांनी दुपारी तीनच्या सुमारास तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. मात्र तरीही नवी मुंबई आणि ठाण्यामधील आंदोलनांमुळे मुंबईची प्रवेशद्वारं संध्याकाळपर्यंत बंद होती. मात्र संध्याकाळनंतर ठाणे आणि नवी मुंबईतली स्थिती निवळली असून दोन्ही शहरं पूर्वपदावर येत आहेत.

मराठा आंदोलनात अनोळखी चेहरे घुसल्याचा संशय- नरेंद्र पाटील


नवी मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये काही अनोळखी चेहरे घुसल्याची शंका मराठा नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना पाटील यांनी या आंदोलनात उपरे आंदोलक घुसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे आंदोलन पेटवण्यासाठी भाडोत्री माणसे पाठवली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं. ठरल्याप्रमाणे एकदिवसीय बंद जाहीर करण्यात आला होता. बंद यशस्वी झाला, त्यामुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला वेळ द्यायला हवा असं आवाहन त्यांना आंदोलनकर्त्यांना केलं. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका आंदोलनातील नवीन चेहऱ्यांनी घेतली, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.


मराठा आंदोलन पेटवण्यामागे समाजकंटक, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा 

मराठा समाजाच्या आंदोलनात समाजकंटकांनी घुसून आंदोलन पेटवल्याचा दावा ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी 20 जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.


याशिवाय आणखी काही संशयीतांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. आंदोलन पेटवल्याच्या प्रयत्न केल्याबद्दल या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.


चर्चेस तयार: मुख्यमंत्री

सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

EXCLUSIVE : मराठा आरक्षण विशेष संवाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांची खास मुलाखत 

मराठा समाजाशी सरकार चर्चेस तयार- मुख्यमंत्री  

मराठा आंदोलन पेटवण्यामागे समाजकंटक, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा