मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून आज राज्यभरात विविध ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, मनमाड, जालना आणि परभणीमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. नाशिकमध्ये आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. धुळ्यात सरकारच्या विरोधात दशक्रिया विधी आणि मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. मनमाड आणि जालन्यात मराठा संघटनांकडून रास्ता रोको करण्यात येईल.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून आज राज्यभरात विविध ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, मनमाड, जालना आणि परभणीमध्ये बंद पाळण्यात येणार आहे.  नाशिकमध्ये आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. धुळ्यात सरकारच्या विरोधात दशक्रिया विधी आणि मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. मनमाड आणि जालन्यात मराठा संघटनांकडून रास्ता रोको करण्यात येईल.

मुंबई 9 ऑगस्टला पुन्हा आंदोलन?

मराठा क्रांती मोर्चाकडून 9 ऑगस्ट रोजी मुंबईसह राज्यात मोठं आंदोलन करण्याची तयारी सुरु आहे. यासंबंधी राज्यात लवकरच मराठा संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. मागील वर्षी 9 ऑगस्ट रोजीच मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.

मुंबई बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मंगळवारी 25 जुलैला आर्थिक राजधानी मुंबई ठप्प झाली होती. काल सकाळी मुंबईत सुरु झालेलं आंदोलन मराठा संघटनांनी दुपारी तीनच्या सुमारास तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. मात्र तरीही नवी मुंबई आणि ठाण्यामधील आंदोलनांमुळे मुंबईची प्रवेशद्वारं संध्याकाळपर्यंत बंद होती. मात्र संध्याकाळनंतर ठाणे आणि नवी मुंबईतली स्थिती निवळली असून दोन्ही शहरं पूर्वपदावर येत आहेत.

मराठा आंदोलन पेटवण्यामागे समाजकंटक, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा 

मराठा समाजाच्या आंदोलनात समाजकंटकांनी घुसून आंदोलन पेटवल्याचा दावा ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी 20 जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.


याशिवाय आणखी काही संशयीतांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. आंदोलन पेटवल्याच्या प्रयत्न केल्याबद्दल या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.


चर्चेस तयार: मुख्यमंत्री

सकल मराठा मोर्चेकऱ्यांशी सरकार सदैव चर्चेस तयार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्र हिताची भूमिका घ्यावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

समन्वयास तयार: संभाजीराजे

मराठा समाजाची इच्छा असेल, तर उदयनराजेंना सोबत घेऊन चर्चा करण्यासाठी आपण सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केलं. एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.

राणे-मुख्यमंत्री भेट

चिघळलेल्य़ा मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मराठा आंदोलन आणि आरक्षणावर चर्चा झाली. पुढच्या दोन दिवसांत आरक्षणावर सरकारकडून योग्य हालचाली होतील असं राणेंनी सांगितलं.

मुख्यमंत्री बदलाची चर्चा

भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली. असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सध्या राज्यात परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलंय. त्यामुळे राज्यातील नेतृत्व बदलाचा निर्णय मोदी आणि अमित शाहांनी घ्यावा असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे. एवढंच नाही तर शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य असल्याची पुष्टीही राऊतांनी दिली. त्यामुळे राज्यात होणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत नाही ना असा प्रश्न पडलाय.

सामनातून हल्लाबोल

काल दिवसभर मुंबई, नवी मुंबईसह राज्यभर अनेक ठिकाणी मराठा समाजानं बंद पुकारला होता. त्याला कुठे हिंसक वळण लागलं तर कुठे बंद शांततेत पाळला गेला. एरव्ही सर्व गोष्टींचं श्रेय घेणारं सरकार काल दिवसभर कुठं होतं? सरकारनं पलायन का केलं? असा सवाल सामनातून मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला.

भाजपचे सरकार आणि मुख्यमंत्री नेहमी "सब कुछ मैं' च्या भूमिकेत असतात. मग तसेच कालच्या बंदचे, दंगलीचे आणि पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता सरकारनं घ्यावं आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, असा तिरकस टोलाही शिवसेनेनं सामनातून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा दिला आहे. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वार  राजीनामा पाठवला. विशेष म्हणजे आमदार हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

दुसरीकडे औरंगाबादेतील वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला.

छावा संघटना मागासवर्गीय आयोगाच्या भेटीला

छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली. सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी आयोगाने पावले उचलावीत असं निवेदन त्यांनी आयोगाचे सचिव अजय कुमार यांना संघटनेच्या वतीनं दिलं.

संबंधित बातम्या

मराठा समाजाशी सरकार चर्चेस तयार- मुख्यमंत्री  

मराठा आंदोलन पेटवण्यामागे समाजकंटक, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा  

कसं मिळेल मराठा आरक्षण? रामदास आठवलेंचा फॉर्मुला  

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्या, राजू शेट्टी यांची लोकसभेत मागणी