ठाणे : भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील बीकेसीत महामेळावा आयोजित करण्यात आला होता. तेथील बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. किंबहुना, काही कार्यकर्त्यांनी महामेळाव्यातच घोषणाबाजी केली. यावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे.


पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“ते कार्यकर्ते फक्त बीडचे नव्हते. त्यांचे चेहरे माझ्या ओळखीचे नव्हते. त्यांच्या हातात मुंडे साहेबांचे पोस्टर होते आणि ते काय म्हणत होते, हे मला स्टेजवरुन नीट ऐकूदेखील येत नव्हतं. पण मंचावरील सर्व नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. त्यामुळे काही वाद नाही.”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

तसेच, “मला स्वतःला दुख झालं की नाही, यापेक्षा मी एका पक्षात आहे, त्याचे काही प्रोटोकॉल आहेत, जे पाळावे लागतात. त्यामुळे मी पोस्टर वादवार काही बोलू शकत नाही.”, असेही त्या पुढे म्हणाल्या.

'दैनिक दिनमान' या वृत्तपत्राच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

नेमकं काय प्रकरण आहे?

भाजपच्या महामेळाव्याच्या एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याने बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. ठिकठिकाणी झळकत असलेल्या पोस्टर्सवरून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो गायब होता. त्यामुळे मुंडे समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी सुरु करुन, गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोस्टरवर लावण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली होती.

महामेळाव्यात मुंडे समर्थकांनी गोंधळ घातल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर मुंडे भगिनींनी मंचावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं.