मुंबई : एकीकडे युती अधांतरी असतानाच शिवसेनेने मात्र ‘एकला चलो रे’ची पूर्ण तयारी केल्याचं दिसतं आहे. ‘मातोश्री’वर आज दुपारी शिवसेना विभागप्रमुखांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे.


मुंबईत 227 जागांसाठी यादी तयार

विभागप्रमुखांच्या बैठकीत सर्व वॉर्डबाबत अंतिम चर्चा होणार आहे. जर ऐनवेळी युती तुटली तर 227 वॉर्डांमधील उमेदवारांची यादी तयार असल्याचंही माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रचाराचीही जय्यत तयारी

याशिवाय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांचे प्रचार दौरे कुठं आणि कसे असणार याचंही पूर्ण नियोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे शिवसेनेने दोन पोस्टर्स जाहीर करुन पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलं आहे.

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये गुप्त बैठक होणार – सूत्र

मुंबईतील सेना-भाजप युतीबाबत अद्यापही धुगधुती कायम आहे. कारण आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट बोलणी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र ही चर्चा कधी आणि कुठे होईल हे कळू शकलं नाही. मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले होते. याच भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेसोबत सुरू असलेल्या घटनांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे ठरवल्याचं समजतं आहे.