मुंबई : मुंबई महापालिकेचा आखाड्यात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही. गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्या वादाचा रोज एक नवा अंक पाहायला मिळत आहे. यापुढे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यात सहभागी होणार नाही, असं मुंबईतील काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवलेल्या एका संदेशात कामत यांनी हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निरुपम आणि कामत यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. हा वाद सोडवण्यासाठी काँग्रेसनं ज्येष्ठ नेते भुपिंदर हुड्डा यांची नेमणूक केली आहे. मात्र त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे भाजपमध्ये गेल्यानं या वादाला आणखी फोडणी मिळाली आहे.
मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी नाही तर मतभेद आहेत, असा अजब दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. निरुपम आणि कामत यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी हे मत व्यक्त केलं. पक्षातील मतभेद चार भिंतीत सोडवले गेले पाहिजेत, खुलेआम मतभेद जाहीर करणं टाळावं, ते पक्षासाठी योग्य नसल्याचंही ते म्हणाले.
राज्यातून जिल्हा परिषदेसाठी आलेल्या नावांवर चर्चा सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरु असल्याची माहितीही अशोक चव्हाणांनी दिली. आम्हालाही आघाडी हवीच आहे, मतदारांचं विभाजन होऊ नये, हीच आमची भुमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.