मुंबई : मुंबईकरांना आजपासून भायखळ्यातील राणीच्या बागेत पेंग्विनचं दर्शन घेता येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पर्यटकांना पेंग्विन्स पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.
मागच्या वर्षी जुलै महिन्यात हम्बोल्ट प्रजातीच्या पेंग्विनना राणीच्या बागेत आणण्यात आलं होतं. तेव्हापासून पेंग्विन केव्हा पाहायला मिळणार, याची उत्सुकता मुंबईकरांना लागून राहिली होती. मात्र, अनेक अडथळ्यांमुळे पेंग्विन दर्शनाचा योग लांबणीवर पडत गेला.
पेंग्विनना पाहण्यासाठी पर्यटकांना किती रूपये शुल्क द्यावे लागणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
दरम्यान, पेंग्विन आणल्यामुळे शिवसेनेवर टीकाही झाली होती. मुंबईतील मुलभूत सुविधा पूर्ण नसताना, पेंग्विनवर कोट्यवधींचा खर्च का, असेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, अखेर सर्व अडथळे पार करत मुंबईकरांना पेंग्विनचं दर्शन घेता येणार आहे.