नवी मुंबई : दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
पावसाळ्यात दिघ्यातील कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका एमआयडीसीनं केली होती. मात्र हायकोर्टानं एमआयडीसीची याचिका फेटाळली. त्यामुळं दिघावासियांचे डोळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहेत.
जर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर दिघावासियांना ऐन पावसाळ्यात बेघर व्हावं लागणार आहे.
मुंबई हायकोर्टात काल काय झालं?
अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिघावासियांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. त्यामुळे दिघ्यातल्या कमलाकर आणि पांडुरंग नावाच्या दोन इमारती उद्याच्या उद्या रिकाम्या कराव्या लागणार आहेत. या इमारती रिकाम्या करुन ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं एमआयडीसीला आदेश दिले.
या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यास थोडा वेळ द्यावा अशी मागणी करत एमआयडीसीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर काल सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टानं दिघावासियांना दिलासा देण्यास नकार दिला.
त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाकडून दिघावासियांना आशा आहेत. अन्यथा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दिघावासियांना बेघर व्हावं लागणार आहे.