मुंबई : मुंबई, पुणे आणि पिंपरीत युतीचा बोऱ्या वाजण्याची चिन्ह आहेत. कारण मुंबईत युतीत तणाव वाढला आहे. तर पुण्यात बैठकच रद्द झाली आहे. दोन बैठकांनंतरही कुठलंही एक सूत्र सेना-भाजप नेत्यांना काढता आलं नाही. शिवाय भाजपकडून स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावरुन उद्धव ठाकरेंवर होत असलेल्या टीकेमुळे शिवसेना संतापली आहे.


चर्चेसाठी आज डेडलाईन

भाजपचा 'फिफ्टी फिफ्टी'चा फॉर्म्युला या चर्चेत मोठा अडसर ठरतो आहे. शिवसेना 50 टक्के जागा भाजपला देण्यास तयार नाही. युतीच्या चर्चेसाठी दोन्ही पक्षांनी आजची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे आजच्या घडामोडींवर युतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

मुंबईत भाजपच्या यादीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई महापालिकेसाठी भाजपने दावा केलेल्या वॉर्ड यादीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. भाजपच्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली. मात्र, शिवसेनेने आपल्या यादीबाबत कुठलीही माहिती दिली नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. दोन्ही पक्षांना हव्या असलेल्या वॉर्डांची यादी एकमेकांना दिली जाणार होती आणि त्यानंतर पुन्हा चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र शिवसेना यादीवर काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळे संभ्रम कायम असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतं आहे.

शिवसेनेला आताच उपरती का झाली, तावडेंचा सवाल

महापालिका निवडणुकांसाठी चर्चेपेक्षा शिवसेना-भाजपामध्ये एकमेकांवर चिखलफेक करण्याच्या चढाओढी सुरु आहेत. शिवसेनेसोबत जागावाटपांसंदर्भात दोन बैठका झाल्या, तेव्हा शिवसेनेने भाजपच्या मंत्र्यांवर आक्षेप घेतले नाहीत. आता अचानक त्यांना उपरती का झाली, असा सवाल भाजपचे मंत्री विनोद तावडेंनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. पारदर्शकतेचा आग्रह धरणारी भाजप चर्चेसाठी भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते कसे पाठवते, असा सवाल शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला होता.

..तर पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र लढू, सेनेचा भाजपला इशारा

पिंपरी चिंचवड महापालिकेतही युतीचं काही खरं नाही असंच दिसतं आहे. युतीसाठी शिवसेनेने 128 जागांचा अंतिम प्रस्ताव दिला असून भाजपनं वेळकाढूपणा केल्यास शिवसेना स्वतंत्र लढेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे. युतीवर चर्चा करण्यासाठी पिंपरीत सेना-भाजपची बैठक झाली. दोन्ही पक्षांनी 32 समान जागांवर आपला दावा ठोकला आहे. ज्याठिकाणी भाजपचे 32 तगडे उमेदवार आहेत. तिथेच शिवसेनेने आपले उमेदवार देण्याचं ठरवलं आहे. भाजपने आधी या 32 जागांचा निकाल लावावा त्यानंतर अंतिम प्रस्तावावर बोलू अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.