मुंबई : मुंबईच्या खारदांडा परिसरात काही केल्या गर्दी कमी होईना. लोक मोठ्या संख्यने मार्केटमध्ये गर्दी करत होते. पोलिसांच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी कोरोनापासून बचावासाठी होत असलेल्या सूचनांचे कोणाकडूनही पालन होत नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक संजय अगलदरे यांनी गर्दी पांगवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी स्वतःच्याच जीपवर सायरन आणि स्पीकर बसवला आणि वॉर्डात पेट्रोलिंग करायला निघाले. सोबत काठ्या-लाठ्या घेऊन कार्यकर्ते लोकांना घरी जाण्याचे आवाहन करत होते. त्यामुळे पोलिसांची गाडी आली या भीतीने अनावश्यक फिरणारी लोकं घरी परतू लागली. तसेच पोलिस यंत्रणेवरचा ताणही कमी होण्यास मदत झाली.


खारदांडा हा अतिशय दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. लागूनच जुहू कोळीवाडा असल्याने बैठी घरं, झोपडपट्टी आणि चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी लोकांची गर्दी होण्यास जास्त वाव आहे.  अशात पोलिसांना सतत या परिसरात पेट्रोलिंग करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे परिसरातील लोकांशी चांगला लोकसंसंपर्क आणि परिचय असल्याने नगरसेवक संजय अगलदरे स्वतःच लोकांना आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरले.



पोलिसांचं गाण्याद्वारे लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन
दुसरीकडे सरकार वारंवार लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. तरीही बरेच लोक संचारबंदी आणि लॉकडाऊनचे नियम डावलून घराबाहेर पडत आहेत. लाठीच्या प्रसादानेही लोक ऐकत नाही म्हटल्यावर आता काही पोलीस थेट गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात राहण्याचं आवाहन करत आहेत. बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने 'सरफरोश' चित्रपटातील 'जिंदगी मौत ना बन जाए' हे गाणं गात लोकांना घराबाहेर पडू असं आवाहन केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या पोलिसाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. संगीताद्वारे केलेलं आवाहन तरी लोक ऐकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Maharashtra Lockdown | साहेब मारा, आधी कपडे घालू द्या; विहिरीवर पोहायला गेलेल्यांना पोलिसांचे फटके