कल्याण : एटीएममध्ये एखादा वयस्कर ग्राहक किंवा महिला पैसे काढण्यासाठी आल्यानंतर, त्यांना फसवून खात्यातले पैसे काढून घेणाऱ्या तिघांना टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सय्यद खान, ओमप्रकाश जयस्वाल आणि तौफिक खान अशी या टोळीतल्या तिघांची नावं असून हे सगळे उत्तर प्रदेशच्या प्रतापगडचे राहणारे आहेत.
हे तिघे एटीएमची फारशी माहिती नसलेल्या ग्राहकाला पिन टाकायला लावून आधी हातचलाखीने बॅलन्स चेक करायचे आणि नंतर आधार कार्ड लिंक नसल्याने पैसे निघत नसल्याचं सांगून ग्राहकाला पिटाळून लावायचे. मात्र ग्राहक निघून गेल्यावर त्याच खात्यातून हे तिघे पैसे काढायचे. अशाप्रकारे कल्याण, भिवंडी, टिटवाळा परिसरात त्यांनी अनेक ग्राहकांना लुटलं होतं.
मात्र टिटवाळ्यात ऑक्टोबर महिन्यात एका महिलेला फसवून लुबाडताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली.
धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या बँक खात्यात तब्बल 28 लाख रुपये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.