मुंबई: मुंबईतल्या सर्वात व्यस्त असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड झाली आहे. तिकीट तपासणीस आमच्या ओळखीचा किंवा नातेवाईक आहे. त्याचा शिक्का मारलेले पत्र असले की सीट कन्फर्म आणि फुकट जायला मिळेल अशा बहाण्याने तीन जणांची टोळी प्रवाशांना लुटत असे. त्यांना कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
मोहम्मद रफिक अल्लाउद्दीन राईन, मोहम्मद दुल्हारे आलमगीर मन्सुरी, मोहम्मद समशेर मोहम्मद आलिम मन्सुरी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून लुटलेला 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
छायाराम रंगीलाल भारद्वाज हे मंगळवारी गोरखपूर एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीच्या रांगेत उभे होते. यावेळी त्याच्याजवळ आरोपी मोहम्मद अल्लाउद्दीन राईन, मोहम्मद दुल्हारे अल्लाउद्दीन मन्सुरी हे दोघे आले. त्यांची या दोघांनी कुठे जाणार म्हणून विचारपूस केली. तसेच आम्हीपण बस्तीला जात आहोत. आम्हाला तिकिटांची गरज नाही, आमचा जिजा ऑफिसर आहे त्याचा स्टॅम्प मारलेल पत्र असल्यास फुकट प्रवास करतो आणि तुम्हाला फुकट प्रवास करायचा का? असे म्हणून त्यांना रिक्षाने काही अंतरावर नेले. नंतर एका ठिकाणी रिक्षा थांबवली जिथे त्यांचा तिसरा साथीदार समशेर मोहम्मद आलिम अन्सारी होता.
त्यांनी या प्रवाशाला मारहाण करून लुटले. त्याचे एटीएम काढून घेऊन त्यातून पैसे काढून घेतले. परंतु पुन्हा भारद्वाज टर्मिनल्सवर गेले असता त्याचवेळी ज्यांनी आपल्याला लुटलं ते लुटारू टर्मिनसवर फिरत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ याची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यातील चौकीत येऊन पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ या टोळीला अटक केली.