मुंबई : मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील इमारत क्रमांक ५४ मध्ये आज (शुक्रवार) प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. दीपक शिवलकर या व्यक्तीच्या घरी आज काही पतपेढी कर्मचारी जप्तीसाठी आले होते. त्यावेळी दीपक शिवलकरने प्रचंड गोंधळ घालत गॅस सिलेंडर स्फोट घडवू अशी धमकीच या कर्मचाऱ्यांना दिली. त्यामुळे या परिसरात बराच वेळ घबराटीचं वातावरण होतं.


कर्जाची वसुली करणारे पतपेढी कर्मचारी कोर्टाच्या आदेशाने शिवलकरच्या घरी जप्तीसाठी आले होते. यावेळी दीपकने गॅस सिलेंडरचा स्फोट करेन अशी धमकी देत घाबरवून सोडलं. ‘घर आणि दुकानात हे अधिकारी आणि पोलीस आले तर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट घडवू.’ अशी धमकी दीपक वारंवार देत होता. त्यामुळे येथील सर्व नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल यांनी घटनास्थळी घेतली. तसंच या इसमाला बरीच समजूतही काढण्यात आली.

दरम्यान, या इसमाने आतापर्यंत अनेकांना गंडा घातला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.