पालघर : गेल्या आठ दिवसांपासून विक्रमगड तालुक्यात वाढलेल्या कडक उन्हामुळे माणसांप्रमाणे मुक्या पशू-पक्षांनाही हैराण केलं आहे. उष्णतेमुळे विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथील दोन पोल्ट्री फार्ममधील 750 हुन अधिक कोंबड्या मरण पावल्या आहेत.
उष्णतेचा पारा 42 अंशावर गेल्यामुळे उन्हाने लहान मुलांच्या आजारातही वाढ झाली आहे. तर पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे मरणाचे प्रमाण वाढले आहे. विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे येथील मिलिंद गायकवाड यांच्या पोल्ट्रीत शुक्रवारी एकाच दिवशी सरासरी पावणे दोन ते दोन किलो वजनाच्या 672 कोंबड्या मरण पावल्या आहेत. याच पोल्ट्री शेजारी असलेल्या भरत शेलार यांच्या पोल्ट्रीतील दीड किलो वजनाच्या 237 कोंबड्या मरण पावल्या आहेत.
विद्युत वितरण कंपनीने शुक्रवारी संपूर्ण दिवस विद्युत पुरवठा खंडीत केला होता. विद्युत पुरवठा नसल्याने उष्णता कमी करण्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये लावलेले पंखे बंद राहिले. तसेच कोंबड्यांना थंडावा निर्माण करण्यासाठी असलेल पाण्याचे फवारे विजेअभावी बंद होते. यामुळे कोंबड्या मरण पावल्या, असं मिलिंद गायकवाड यांनी सांगितले. मिलिंद गायकवाड व भरत शेलार या दोन्ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरु केला आहे. मात्र आता नुकसान भरपाई कशी होणार या विवंचनेत ते अडकले आहेत.