नोटांवरुन महात्मा गांधींचे फोटो हटवण्याची मागणी करत ट्विटरवर नथुराम गोडसेचे आभार मानल्यामुळे मुंबई महापालिकेच्या उपायुक्तपदी असलेल्या निधी चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. ट्वीट वादग्रस्त ठरत असल्याचं लक्षात येताच निधी चौधरींनी ट्वीट डिलीट करुन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता.
गांधीहत्या | गांधीहत्येबद्दल थॅंक्यू गोडसे म्हणणाऱ्या निधी चौधरींवर कारवाईची मागणी | स्पेशल रिपोर्ट
काय होतं ट्वीट?
'150 व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. (रडणारी इमोजी) आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावं बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. 30.01.1948' अशा आशयाचं इंग्रजी ट्वीट करुन निधी चौधरींनी सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो जोडला होता.
17 मे रोजी केलेलं आपलं ट्वीट वादाला कारणीभूत ठरत असल्याचं लक्षात येताच त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं होतं. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी काही ट्वीट्स केली होती. 'काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्वीट डिलीट केलं आहे. तुम्ही 2011 पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही' असं म्हणत हे ट्वीट उपरोधिक असल्याचं सांगितलं होतं.
'नोटांवरुन गांधीजींचे फोटो हटवा, थँक्यू गोडसे' ट्वीटवरुन बीएमसी उपायुक्त वादाच्या भोवऱ्यात
निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असं कृत्य करणं गंभीर असल्याचं पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
कोण आहेत निधी चौधरी?
निधी चौधरी या 2012 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.