वसई : एका चोराने चोरी केल्यानंतर चक्क दोन दिवस बंगल्यामध्ये मुक्काम केला. नुसता मुक्कामच नाही, तर बंगल्यातलं जिन्नस वापरुन चमचमीत पदार्थही बनवून खाल्ले. मात्र ही चैन केल्यानंतर आता चोराला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. कारण
पोलिसांनी त्या पठ्ठ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

दोन दिवस एका अलिशान बंगल्यात ऐशोआरामात घालवल्यानंतर, आता या राजकुमारवर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी राजकुमार निशादला घरफोडी प्रकरणी अटक केली आहे.

या पठ्ठ्यानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं, वसईतील डॉक्टर प्रशांत पाध्ये यांच्या बंगल्यात हात साफ केला. मात्र काम फत्ते झाल्यानंतर इतर चोरांप्रमाणे राजकुमारनं पळ काढला नाही. तर त्यानं बंगल्यातच मुक्काम करायचं ठरवलं.

डॉक्टर परगावी गेल्यामुळे, राजकुमार आणि त्याच्या मित्रानं बंगल्यात दिवाळी साजरी केली. बंगल्यातल्या हालचाली पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी लागलीच पोलिसांना खबर दिली.

पोलिसांनी बंगल्यातून राजकुमार निशादला अटक केली, मात्र त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. राजकुमार निशाद हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर राजकुमारच्या हाती डॉक्टरांचा एक लॅपटॉप आणि डिजिटल कॅमेरा लागला. तोही पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र या मुद्देमालापेक्षा डॉक्टरांच्या बंगल्यातलं दोन दिवसांचं वास्तव्य त्याच्यासाठी जास्त मौल्यवान होतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.