मुंबई: मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचं पुन्हा एक संतापजनक उदाहरण समोर आलं आहे. स्टंटबाज नराधमांमुळे अनेकांचे जीव गेले आहेतच. त्यात आता प्लॅटफॉर्मवर उभं राहून, लोकलमधील प्रवाशांचे मोबाईल खेचणाऱ्यांमुळेही जीव जात आहेत.

ठाण्याजवळच्या कळवा स्टेशनवर एका चोरट्यानं धावत्या लोकलमधून दारावर उभ्या असणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल खेचला.  आपल्या मेहनतीचा मोबाईल चोरीला जाऊ नये, म्हणून प्रवाशानेही धावत्या लोकलमधूनच फलाटाच्या दिशेनं उडी मारली.  मात्र तोपर्यंत फलाट संपला होता. त्यामुळे तो प्रवासी रुळावर पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

कळव्यामध्ये 19 ऑगस्ट रोजी रात्रीच्या 12:53 वाजता ही घटना घडली. रात्रीच्या 12.53 मिनीटाच्या कल्याणकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेत हा प्रकार घडला. कळवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील हा प्रकार आहे.

एका मोबाईलसाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चोरटे लोकांचे जीव घेत असताना, रेल्वे पोलीस झोपा काढतायत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कुणाच्या मेहेरबानीनं चोरट्यांची हिंमत लोकांचा जीव घेण्यापर्यंत जाते, असाही संतापजनक प्रश्न आता विचारला जातोय.

19 ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर अजूनही चोरटा आणि मृत प्रवासी कोण होते यांची माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका मुलाने धावत्या लोकलमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते, तसा काळ्या टी-शर्टमधील तरुणाने दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशाचा मोबईल खेचला. त्यानंतर त्या प्रवाशाने लगेच ट्रेनमधून उडी मारल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.


मोबाईल चोरांचे प्रमाण अधिक

2017 या पूर्ण वर्षात 18 हजार मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मोबाईल चोरीचे 100 गुन्हे रोज दाखल होतात अशी माहिती दोन महिन्यापूर्वी GRP नी दिली होती. जे प्रवासी त्यांचा मोबाईल मिळण्याची आशाच सोडून देतात ते पोलिसात तक्रार द्यायला येत नाहीत. पोलिसात तक्रार न देणाऱ्या प्रवाशांचेही प्रमाण बरेच आहे असेही त्यांनी म्हटले होते.