मुंबई : "मी खूप भावनिक आहे, मी लहानपणापासून मितभाषी आहे अशी व्यक्ती राजकारणात योग्य नसते, त्यामुळे मला असं अनेकदा वाटतं की मी चुकीचं क्षेत्र निवडलं आहे", अशा भावना बॉलिवूड अभिनेत्री आणि सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केल्या आहेत. मातोंडकर आज (शनिवार) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी अनेक राजकीय गोष्टींवर भाष्य केले.

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, "मी सुरुवातीला राजकारणात यायचं ठरवलं होतं. काँग्रेसचीच निवड केली होती. परंतु मी निवडणूक लढण्याबाबत कधीही विचार केला नव्हता. वरिष्ठांनी निवडणूक लढण्यास सांगितले तेव्हा नकारही देता आला नाही. मात्र जेव्हा मी निवडणूक लढण्यास होकार दिला, त्यानंतर खूप मेहनत केली आहे."

उर्मिला मातोंकर यांनी यावेळी सांगितले की, "कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक जिंकायचीच आहे, असा विचार करुन प्रचार नाही केला, मला लोकांमध्ये माझं स्थान निर्माण करायचं होतं. त्यासाठी मी लोकांमध्ये गेले, त्यांच्याशी बोलले. त्यांच्यासाठी मी काय करु शकते, हे त्यांना सांगितलं."

व्हिडीओ पाहा



उर्मिला म्हणाल्या की, "भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या राजकारणातल्या माझ्या आदर्श नेत्या आहेत. मी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी, अगदी लहानपणापासूनच त्यांची चाहती आहे. त्यांच्याइतकी कणखर व्यक्ती मी पाहिलेली नाही. त्यामुळे मला त्या आवडतात."