वसई : बिल्डरच्या हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी आणि कुख्यात डॉन छोटा राजनच्या खास हस्तकाला मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 16 वर्षांपासून फरार असलेल्या कमलेश जैनला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या नालासोपारा युनिटने अटक केली. नालासोपाऱ्यातील बांधकाम व्यावसायिक राजेश पतंगे यांच्या हत्या प्रकरणात पोलिस त्याच्या मागावर होते.

आरोपी कमलेश जैन हा छोटा राजनचा खास हस्तक. तो छोटा राजनच्या जमिनीचा व्यवहार बघत होता. 25 ऑक्टोबर 2003 रोजी बांधकाम व्यावसायिक राजेश चंद्रकांत पतंगेची त्याच्याच बिल्डींगमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज भागातील राधाकृष्ण अपार्टमेंटजवळ सकाळी पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. आरोपींनी मिरा रोड येथील जमिनीच्या वादातून ही हत्या केली होती. या हत्येची सुपारी छोटा राजनला देण्यात आली होती.

या प्रकरणात एकूण 14 आरोपींचा सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं. त्यापैकी दहा आरोपींना अटकही करण्यात आली होती. तर एका आरोपीचं मुंबईत एन्काऊन्टर करण्यात आलं होतं. यात सोळा वर्षांपासून फरार असलेला छोटा राजनचा खास हस्तक कमलेश जैनचंही नाव होतं. मात्र तो 16 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

जैन बोरीवली रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या नालासोपारा टीमला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

गुन्हेगार कितीही चतुर असला तरी पोलिसांच्या नजरेतून तो कधीच सुटत नसतो. ही गोष्ट पुन्हा एकदा या घटनेवरुन अधोरेखित झाली. या हत्या प्रकरणात छोटा राजनचाही सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता सीबीआयकडे ताबा असलेल्या छोटा राजनला चौकशीसाठी पालघरला आणण्याची तयारी स्थानिक गुन्हे शाखेची चालली आहे.