गणरायासमोरची दानपेटी पळवणाऱ्या चोराला चोप
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2016 02:09 AM (IST)
कल्याण: कल्याणमध्ये चोरट्याने थेट गणपती समोरची दानपेटीच पळवण्याचा प्रयत्न केला. गणपती मंडळाची दानपेटी पळवणाऱ्या चोरट्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला. कल्याण पश्चिमेत चिकणघरचा राजा हा नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळं भाविक राजाच्या दानपेटीत सढळ हस्ते दान टाकतात. रविवारी सकाळी दीपक जाधव नावाच्या चोरट्यानं बाप्पासमोरची दानपेटी पळवली. याचवेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास त्याची धुलाई केल्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं. त्याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.