नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलने केलेल्या कारवाईत 175 ग्रॅम मॅफेडॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. साधारणत: पाच लाख रुपये किमतीचा हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी राफे उर्फ रफिक कादिर खान या आरोपीला ही अटक केली आहे.
नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणात जाळं पसरत असून महाविद्यालयीन तरुण या अंमली पदार्थांच्या अधिक आहारी जात आहेत. हे रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अँटी नार्कोटिक सेलची स्थापना केली. तेव्हापासून पोलीस अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांच्या मागावर होते.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रफिक खान हा रबाळे एमआयडीसीमधील एका कंपनीजवळ मॅफेडॉन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन दिवस सापळा रचून या आरोपीला अटक केली. हा आरोपी वसई मध्ये राहणारा असून हा अंमली पदार्थ हा कुठून आणतो किंवा कुणाला विकतो याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.