उल्हासनगर: पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ चोरट्यांनी 3 दुकानं फोडली!
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2017 09:18 AM (IST)
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये चोरट्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ मंगळवारी एकाच रात्रीत तीन दुकानं फोडल्याची घटना घडली आहे. शहरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी मोठी चोरी केली आहे. पवई चौकातील जी तीन दुकानं चोरट्यांनी फोडली त्या दुकानांपासून हाकेच्या अंतरावर पोलीस आयुक्त कार्यालय आहे. कार्यालय परिसरात पोलिस पेट्रोलिंग करत असतात. चोरटयांनी आज पहाटेच्या सुमारास पवई चौकातील तीन दुकानांची शटर तोडून दुकानातील माल लंपास केला. दरम्यान, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरांचा शोध घेत आहेत. मात्र, चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातवरण आहे.