मुंबई : शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका हेमांगी चेंबुरकर यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. एका हॉटेल चालकाकडून 16 हजाराची लाच घेताना हेमांगी चेंबुरकर आणि त्यांचा सचिव राजाराम रेडकरला अटक करण्यात आली.
हेमांगी चेंबुरकर या मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 199 च्या नगरसेविका आहेत. तिथल्या एका हॉटेल मालकाविरोधात वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी हेमांगी चेंबुरकरांनी हॉटेल मालकाकडे 25 हजारांची लाच मागितली.
दरम्यान, 25 हजार रुपयांपैकी 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं हेमांगी आणि त्यांच्या सचिवाला अटक केली.
एकीकडे निवडणुकीचे वारे वाहत असून, लाचखोरी प्रकरणी नगरसेविकला अटक होणं हा शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. शिवाय, भाजपही हे प्रकरण शिवसेनेविरोधात प्रचाराचा मुद्दा बनवण्याची शक्यता आहे.