मुंबई : सर्वसामान्यांसाठी मुंबईत हक्काचं घर देणारं, म्हाडा आता आवाक्याबाहेर जाऊ लागलं आहे. कारण पवईतल्या तुंगा भागातील म्हाडाच्या इमारतीतील 750 स्क्वेअर फुटांचा सर्वात महागडा प्लॅट हा 1 कोटी 61 लाखांना विकला जाणार आहे


पवईतल्या तुंगा इमारतीतील प्लॅट विकण्यासंदर्भातील जाहिरात निघायची आहे. पण माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती मागवल्यानंतर, ती पाहून अनेकांना अश्चर्याचा धक्का बसला. कारण या सदनिकांची किंमत तब्बल 1 कोटी 61 लाखांना विकल्या जाणार आहेत.

वास्तविक, बांधकामाच्या खर्चावर म्हाडाच्या घराची किंमत ठरते. प्रशासकीय खर्च आणि सोडतीचा खर्च यासाठी म्हाडा उच्च उत्पन्न गटातील घरांच्या रकमेवर 10 टक्के नफा वसूल करते. पण तरीही घरांची किंमत बाजारभावापेक्षा अधिक का होते हे कोडंच आहे. विशेष म्हणजे, म्हाडाला मिळालेल्या जागांमुळे घराच्या किंमती कमी होणं अपेक्षित असताना, तसं अजिबात होत नसल्याचं चित्र आहे.

दरम्यान, म्हाडाची घरं महाग होण्याची लागण आधीपासूनच आहे. गेल्या वर्षी याच भागातील म्हणजे दहिसरमधील एक सदनिका 84 लाखाला विकली गेली होती. तर वर्सोव्यातली सर्वात महागडी सदनिका 84 लाखा किमतीची होती.

दुसरीकडे कांदिवलीत एका सदनिकेसाठी 71 लाख खर्चा मोजावे लागले होते. तर शिंपोलीतल्या एका घरासाठी 70 लाख मोजावे लागले. गोराईत  म्हाडाच्या सदनिकांचे दर गगनाला भिडले होते. गोराईत 67 लाखांना एक सदनिका विकली गेली. शिवाय, मागाठाण्यात 56 लाखांना सदनिका विकली गेली आहे. त्यामुळे म्हाडांच्या घराच्या किमतीही आता बाजारभावापेक्षा जास्त होत असल्याचं चित्र आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांसाठी स्वस्त दरात घरं उपलब्ध करुन देण्यासंदर्भात योजना तयार करत आहेत. तर दुसरीकडे म्हाडाच्या घरांच्या किमती गगनाला भिडत असल्याने, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील म्हाडाची घरं आता महाग झाली आहेत.