मुंबई: मुंबई 'मेड इन इंडिया' आणि 'स्टार्टअप'चे वारे देशात वेगाने वाहत आहेत. सायकल निर्मिती क्षेत्रातील बड्या परदेशी कंपन्या अत्याधुनिक आणि वेगळ्या प्रकारच्या सायकली घेऊन भारतीय बाजारपेठेत दाखल होत असताना भारतातील अनेक मंडळीसुद्धा सायकलवर नानाविध प्रयोग करत आहेत. नेमके हे प्रयोग काय आहेत, निर्मितीमागचं विज्ञान, आर्थिक गणित, पर्यावरण संवर्धानाला त्याचा कशाप्रकारे हातभार लागणार आणि नेहमीच्या वापरातील सायकलपेक्षा वेगळ्या सायकली बनवण्याच्या प्रयोगामागची कहाणी यावेळच्या 'सायकल कट्टा'वर उलगडणार आहे.


बांबूपासून तयार केलेली, अपंगांसाठीची, बॅटरीवर आणि सौरऊर्जेवर चालणारी, टॅन्डम सायकल, दुमडणारी सायकल, भारतीय बनावटीचे सायकलचे भाग आणि संपूर्ण सायकलच्या निर्मितीमागच्या कथा पहिल्यांदाच त्यांच्या निर्मात्यांच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे गप्पांच्या पलिकडे जाऊन त्या सायकली प्रत्यक्ष पाहताही येणार आहेत.

यातील काही प्रयत्न हे प्रयोगशील तत्त्वावर तर काही व्यावसायिक स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने केले जात आहेत. त्यामुळे या सर्वांना 'सायकल कट्टा'च्या व्यासपीठावर एकत्रितपणे ऐकणं ही सायकलप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. 'सायकल कट्टा' रविवार, ४ जून रोजी माटुंगा रोड येथील डी. जी. रूपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत पार पडणार आहे. कट्टा सर्वांसाठी मोफत खुला आहे.