Raj Thackeray :  शिवसेनेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या मेळाव्यात आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतून बाहेर जावं हीच उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. शिवसेना सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं, याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला. 


शिवसेना आणि धनुष्यबाण यावरुन जो वाद सुरू होता त्यामुळे वेदना होत होत्या, कारण लहानपणापासून शिवसेना अनुभवली. असंख्य लोकांनी घामातून उभी केलेल्या संघटनेची अवस्था अशी होताना वाईट वाटत होते, असे राज यांनी सांगितले. मागील काळात ज्या घडामोडी घडल्या त्याचा हा परिणाम होता, असेही राज यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, सगळ्यांना फक्त महाबळेश्वरची घटना सांगितली जाते. त्या आधीच्या काही घडामोडी लोकांना माहिती हवी म्हणून सांगतोय. त्यावर कोणी समोरून कोणी सकाळी प्रत्युत्तर दिले तर आणखी काही गुपिते बाहेर काढेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.


राज ठाकरे यांनी सांगितले की, मी उद्धव ठाकरे यांना घेऊन मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो. त्याठिकाणी आम्ही दोघंच होतो. मी उद्धव ठाकरे यांना म्हणालो होतो की, तुला काय हवंय? मला फक्त प्रचारापुरतं बाहेर काढू नका... त्यावर उद्धव ठाकरे यांनी ठीक आहे म्हटले. तुला पक्षप्रमुख व्हायचे आहे का असे विचारल्यावर उद्धव  ठाकरेंनी होकारार्थी उत्तर दिले. तुला मुख्यमंत्री व्हायचे का असे विचारल्यानंतर त्यालाही होकारार्थी उत्तर दिले. त्यावर माझी पक्षातील भूमिका काय असणार हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. मला फक्त प्रचाराच्या वेळी बाहेर काढू नका, असेही उद्धव यांना सांगितल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. 


हा संवाद संपल्यानंतर आम्ही मातोश्रीवर आलो. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो आणि त्यांना आमच्यातील वाद मिटले असल्याचे सांगितले. हे ऐकून बाळासाहेबांना बरं वाटलं. त्यांनी उद्धव ठाकरे यांना बोलवण्यास सांगितले. त्यावेळी उद्धव यांना बोलवण्याचा निरोप देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पाच मिनिटात येतो असे सांगितले. थोड्या वेळाने पुन्हा एकदा निरोप पाठवला तेव्हा उद्धव ठाकरे हे मातोश्रीमधून बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले. उद्धव यांनाच मी शिवसेने बाहेर जावं असं वाटतं होतं असा दावा राज ठाकरे यांनी केला. 




इतर महत्त्वाच्या बातम्या :