मुंबई: नोटाबंदीनंतर दोन हजाराच्या नोटेसाठी केलेल्या रिकॅलिब्रेशननंतर, आता पुन्हा एकदा बँकांना आपली एटीएम रिकॅलिब्रेट अर्थात करावी लागणार आहेत. दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने तसे आदेश बँकांना दिले आहेत.

पण या रिकॅलिब्रेशनसाठी बँकांना थोडाथोडका नव्हे तर तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. जवळपास 2 लाख 20 हजार एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी 5 ते 6 महिने लागू शकतात.

नोटाबंदी, थकीत कर्ज या आणि अन्य कारणांमुळे बँका आधीच अडचणीत असल्याचं सांगत आहेत. त्यात एटीएम रिकॅलिब्रेट करण्याचा खर्च बँकांना करावा लागणार आहे.

सध्या एटीएममध्ये 100, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा मिळतात. मात्र नोटाबंदीनंतर दोनशेची नवी नोट बाजारात आली. या नोटेच्या रचनेमुळे ती नोट एटीएममध्ये मिळत नाही. ती केवळ बँकेतच मिळते.

त्यामुळे ही नोटही एटीएममधून मिळावी, यासाठी एटीएमच्या रचनेत बदल करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.

दोन हजारऐवजी छोट्या-छोट्या नोटा चलनात आणण्याचा बँकांचा उद्देश आहे. त्यासाठीच आरबीआय हे पाऊल उचलत आहे.  दरम्यान, एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी बँकांना किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

नोटाबंदीनंतर एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा उपलब्ध झाल्याने, एटीएममधून पैसे काढण्याचं प्रमाण वाढलं आहे. दोनशेच्या नोटा एटीएममध्ये उपलब्ध झाल्याने ते प्रमाण कमी होईल, असा विश्वास आरबीआयला आहे.

संबंधित बातम्या

दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना

200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली!