भिवंडी : मुंबई इमारत दुर्घटनेनंतर आता भिवंडी महानगर पालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेण्यास सुरुवात केली केली आहे. त्यानुसार 782 धोकादायक इमारती मनपा हद्दीत असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणांत उघड झाले आहे. या धोकादायक इमारतींमध्ये 210 इमारती या अतीधोकादायक आहेत. यातील 43 इमारती तोडण्याची कारवाई लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती शहर विकास विभागाकडून देण्यात आली आहे.
शहरात असलेल्या या धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 25 हजार कुटुंब राहत असून सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला होता तर 42 जण जखमी झाले होते. यावेळी शासनाने दखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याच्या निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने फक्त नोटीस व कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानून या धोकादायक इमारातींकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनपा प्रशासन या धोकादायक इमारतींमधील राहिवासींना नोटीस देऊन इमारत खाली करण्याच्या सूचना देत आपले कर्तव्य झटकत आहे. मात्र, सध्या कोरोना संकटात ही कुटुंबे कुठे जाणार आणि कुठे राहणार हा खरा प्रश्न नागरिकांना पडला असून या धोकादायक इमारतींमध्ये नागरिक आपला जीव मुठीत धरून एक एक दिवस काढत आहे.
भेंडी बाजारातील धोकादायक जीर्ण इमारतींवर कारवाई का केली नाही? : हायकोर्ट
नागरिकांचे जीव टांगणीला
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एकूण पाच प्रभाग समित्या असून यातील प्रभाग समिती क्र 1 मध्ये 16, प्रभाग समिती क्र 2 मध्ये 159, प्रभाग समिती क्र 3 मध्ये 108, प्रभाग समिती क्र 4 मध्ये 278, प्रभाग समिती क्र 5 मध्ये 221 अशा एकूण 782 धोकादायक इमारती आहेत. या इमारतीमध्ये सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरिक राहत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शहरासह राज्यात व देशात कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने या धोकादायक इमारतीत राहणारी कुटुंबे हवालदिल झाले आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि लोक प्रतिनिधी यांनी पुढाकार घेवून धोकादायक इमारतीचा धोका कसा टाळता येईल व त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
Mumbai Building Collapse | दुर्घटनेत आणखी तिघांचा मृत्यू, मृतांचा एकूण आकडा 9 वर