मुंबई : नौदलाने मरीन ड्राईव्हवर होणाऱ्या तरंगत्या हॉटेलवर आक्षेप घेतला. आता मलबार हिलमध्ये आक्षेप घ्यायचं काय कारण? पण आपल्याकडे एखादा निर्णय घेतला, की त्याला विरोध करण्याची मानसिकता झाली आहे, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.


मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई पोर्टमधील हे टर्मिनल केवळ राज्यातीलच नाही, तर देशातील पहिलं क्रूझ टर्मिनल असणार आहे. मुंबईनंतर देशातील अन्य 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल उभारण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे गडकरींनी ज्यावेळी नौदलाची शाळा घेतली, त्यावेळी पश्चिम नौदल प्रमुखही व्यासपीठावर उपस्थित होते. क्रूझ टर्मिनलमुळे वर्षाला 950 क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यांवर येतील. त्यामुळे रोजगार आणि उत्पन्न दोन्ही वाढण्यास मदत होईल, असं गडकरी म्हणाले.

मुंबईत जलमार्ग विकसित होण्याची गरजही गडकरींनी बोलून दाखवली. येत्या काळात 10 हजार सी प्लेन सुरु करण्याचा विचार आहे. लोक रस्त्यावरून समुद्रात आणि परत रस्त्यावर प्रवास करू शकतील, असा विचार असल्याचं गडकरी म्हणाले.

शिवाय प्रदूषण रोखण्यासाठी पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करणं आणि इलेक्ट्रिक हायवे करण्याचा विचार असल्याचं गडकरींनी सांगितलं.

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची वैशिष्ट्य :

  • 300 कोटी रुपयांचा प्रकल्प.

  • 4.15 लाख चौरस फुटांवर बांधकाम होणार.

  • दरवर्षी 7 लाख प्रवासी क्षमता असलेलं टर्मिनस.

  • दरवर्षी 200 क्रूझ येऊ शकतील.

  • 365 दिवस कार्यान्वित रहाणार.

  • देशातलं पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल.

  • सागरमाला प्रकल्पांतर्गत समावेश.

  • समुद्रातील क्रूझ पर्यटनाला चालना मिळेल.

  • जून 2019 पर्यंत क्रूझ टर्मिनलचं बांधकाम पूर्ण होणार.

  • 2041 पर्यंत 28 हजार 400 कोटी रुपयांची उलाढाल करण्याची क्षमता