Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेची लोकल (Western Railway Local) सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. जवळपास पाऊस तासापासून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अचानक पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. 


हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा देखील सकाळी ठप्प झाली होती.  नेरुळ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रखडल्या होत्या. जवळपास एका तासापासून अनेक गाड्या मध्येच रेल्वे ट्रॅक आणि स्थानकात उभ्या होत्या. हार्बर लाईन ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. 60 ते 70 मिनिटांनंतर हार्बर रेल्वेवरील लोकल सुरळीत झाल्या.


पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा मेगाब्लॉक-


पश्चिम रेल्वेवर (Western Railway Megablock) 35 दिवासांचा मेगाब्लॉक (Megablock) सुरु आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. गोरेगाव-कांदिवली विभाग हा वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचा भाग आहे. वांद्रे टर्मिनस-बोरिवलीदरम्यान पाचवी मार्गिका आणि खार रोड-गोरेगावदरम्यान सहावी मार्गिका सुरु झाली आहे. आता गोरेगाव कांदिवलीदरम्यान 4.5 किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम सुरु होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान जवळपास 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.


प्रत्येक ब्लॉकमध्ये केवळ 130-140 गाड्या रद्द-


प्रत्येक ब्लॉकमध्ये केवळ 130-140 गाड्या रद्द करण्यात येणार आहे. मेगाब्लॉकचा कालावधी सुरू झाल्यानंतर पाचव्या, 12 व्या, 19 व्या, 26 व्या आणि 33 व्या दिवशी हे ब्लॉक घेतले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाचे दिली. नोव्हेंबर 2023 मध्ये पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ-गोरेगाव कॉरिडॉरवरील या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला. गोरेगाव आणि कांदिवली विभागात सुधारणा करण्यासाठी हा विस्तार कायम राहणार आहे. सदर प्रकल्प 2008 मध्ये सुरु झाला असून डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू-


रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या काळात रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो. परंतु रेल्वे प्रशासनाकडून अतिजलद गाडीच्या निकषांत कोणताही बदल किवा शिथिलता आणली जात नाही, असे मत कोकण रेल्वे समितीने व्यक्त केले आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वे मंडळ, रेल्वे विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.


संबंधित बातमी:


मोठी बातमी: पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द होणार