Harbour Local Train: हार्बर लाईनवरील (Harbour Line Local) लोकल गेल्या 45 मिनिटांपासून ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे. नेरुळ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रखडल्या आहेत. गेल्या पाऊण तासापासून अनेक गाड्या मध्येच रेल्वे ट्रॅक आणि स्थानकात उभ्या आहेत. हार्बर लाईन ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहे. सकाळी 7.30 वाजता हार्बर मार्गावरील पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने लोकल सुरु झाल्या आहेत. मात्र ठाण्याला जाणाऱ्या लोकल अजूनही रखडल्या आहेत.
एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग सन 2008 मध्ये मंजूर करण्यात आला होता. रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सीएसएमटी ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गासाठी आता तयारी सुरु झाली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु आहे. नव्या आराखड्यानुसार पाचवी आणि सहावी मार्गिका टाकायची झाल्यास त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. परिणामी भविष्यात हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकातच संपेल. तर यापुढे मध्य रेल्वेमार्गावरील (Central Railway) फास्ट लोकल ट्रेन भायखळ्यात थांबणार नाहीत. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव-
सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. यामुळे सीएसएमटीतील हार्बरसाठीचा फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होईल. यासोबतच भायखळ्यातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकलसाठीचा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येईल. भायखळा स्थानकातून जलद लोकलवरील प्रवाशांची संख्या कमी आहे. यामुळे याचा वापर नव्या मार्गिकांकरिता करण्यासाठी जलद मार्गावरील फलाट तोडून त्या ठिकाणी नवी मार्गिका उभारणे शक्य आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवणे आणि जलद लोकलचा भायखळा थांबा हटवणे हा एकमेव पर्याय सीएसएमटी ते परळदरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी कमी खर्चात आणि निश्चित कालावधीत करणे शक्य आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकात हार्बर मार्ग उन्नत आणि मुख्य मार्ग जमिनीवर आहे. यामुळे हार्बरने सीएसएमटीपर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मुख्य मार्गावरील लोकल पकडून सीएसएमटी गाठणे शक्य आहे.
संबंधित बातमी:
मोठी बातमी: पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द होणार