मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहाच्या बागेची नासधूस केल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राजगृह हे महराष्ट्रातील तमाम जनतेचं तीर्थक्षेत्रच आहे, त्याचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत," असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाने केलं आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी मंगळवारी (7 जुलै) दोन अज्ञातांनी नासधूस केली. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसंच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचंही नुकसान झालं आहे. माटुंगा पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.


या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत तातडीने आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नसल्याचा सज्जड दम भरला.


डॉ. आंबेडकरांच्या राजगृहाच्या बागेत नासधूस, प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन


राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट केलं आहे की, "राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत.





'राजगृह' तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून : उपमुख्यमंत्री
दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या 'राजगृह' निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


दोषींवर कठोर कारवाई करणार : गृहमंत्री
तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे की, "दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.





बाबासाहेबांचं वैयक्तिक ग्रंथालय असलेलं राजगृह हेरिटेज वास्तू
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे. मुंबईच्या दादर पूर्वमधल्या हिंदू कॉलनी परिसरात त्यांचं हे निवासस्थान आहे. पुस्तकांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर बांधलं होतं. राजगृहात बाबासाहेबांनी 50 हजारांहून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. त्यावेळी ते जगातील सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय होतं. 2013 मध्ये राजगृहाचा समावेश हेरिटेज म्हमून झाला. ही ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 15 ते 20 वर्ष राजगृहामध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी इथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात.