जयदेव ठाकरेंचे उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक आरोप
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 20 Jul 2016 04:25 PM (IST)
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरुन उद्धव आणि जयदेव ठाकरे यांच्यात सुरु असलेल्या कोर्टकचेरीला आज नाजूक वळण मिळालं. आज हायकोर्टात साक्ष नोंदवताना जयदेव ठाकरे यांनी उद्धव आणि ठाकरे कुटुंबावर अतिशय वैयक्तिक आणि बेफाम आरोप केले. जयदेव यांनी आरोपांची सरबत्ती सुरु करताच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही काही काळ भांबावले. त्यानंतर न्यायमूर्तींनी जेवणाची सुटी जाहीर केली आणि जयदेव यांची उरलेली साक्ष इन कॅमेरा नोंदवण्यात आली. आजच्या साक्षीत जयदेव यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांवर प्रकाश टाकला. ज्याचा तपशील ठाकरे कुटुंबासाठी मोठा मानहानिकारक असा आहे. त्यामुळं ठाकरे कुटुंबातील संपत्तीच्या वादाला कटू वळण मिळालं आहे. उद्यापासून या प्रकरणाची पुन्हा जाहीर सुनावणी होईल.