मुंबई : सरकारनं डाळीचे दर नियंत्रणात आणण्याची घोषणा करुन दीड ते दोन वर्षे उलटली मात्र अजूनही तूरडाळी दीडशे ते दोनशे रुपये किलो आहे. पण आता ‘बिग बाझार’नं मात्र ग्राहकांना 99 रुपयात एक किलो तूरडाळ द्यायला सुरुवात केली आहे.


 

गेल्या दोन वर्षांपासून दोनशेचा टप्पा गाठणारी तूर डाळ बिग बाझारमध्ये आता 99 रुपये किलोनं मिळायला सुरुवात झाली आहे. वाढत्या महागाईवर उतारा म्हणून किरकोळ बाजारात तूरडाळ 120 रुपये किलोनं उपलब्ध करुन देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली. त्यासाठी 1 ऑगस्टची डेडलाईन होती. पण त्यापूर्वी बिग बाझारमध्ये तूरडाळ 99 रुपये किलोनं मिळायला सुरुवात झाली आहे.

 

सरकारनं अंत्योदय योजनेखाली बीपीएल धारकांना 120 रुपये किलो दरानं तूरडाळ उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. पण बिग बाझारमध्ये फक्त 99 रुपये किलो डाळ उपलब्ध झाली. पण या डाळीच्या दर्जावर काही ग्राहकांनी शंका घेतली आहे.

 

जर बिग बाझारला 99 रुपयात एक किलो डाळ उपलब्ध करुन देणं शक्य असेल तर राशन दुकानावर, सरकारी भांडारामध्ये ही डाळ 99 रुपये किलोनं का मिळत नाही? शिवाय खुल्या बाजारातही त्याच दरानं डाळ मिळायला हवी. त्यामुळे डाळीच्या धंद्यात काळाबाजार नेमकं कोण करतंय? याचा शोध फडणवीस सरकारनं घेणं आवश्यक आहे.