मुंबई: बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचा मुलगा चिराग याचं 1 डिसेंबरला लग्न (कोर्ट मॅरेज) आहे. मुलाच्या लग्नासाठी पैसै काढण्यासाठी ते दादरच्या शिवाजी पार्कमधील एसबीआय ब्रांचमध्ये गेले. मात्र अद्याप त्यांना रक्कम मिळू शकलेले नाहीत.
लग्न खर्चासाठी अडीच लाख रुपयांची रक्कम काढता येईल, अशी घोषणा केंद्र सरकारनं केल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, ही घोषणा हवेतच विरल्याचा अनुभव अनेकांना येतो आहे.
दरम्यान, याविषयी बोलताना संदीप पाटील म्हणाले की, 'सरकारनं हा जो निर्णय घेतला आहे त्याचं मी स्वागतच करतो. मुलाच्या लग्नासाठी मी काल पैसे काढण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी काय काय कागदपत्र लागतील याची माहिती दिली. त्यानंतर मी ते कागदपत्रं घेऊन गेलो. पण त्यांना मूळ कागदपत्रं हवी आहेत. त्यामुळे आता मला उद्या पुन्हा बँकेत जावं लागणार आहे. मुलाचं कोर्ट मॅरेज आहे. त्यामुळे आम्ही पत्रिका छापलेली नाही. त्यामुळे त्यांना इतर आवश्यक कागदपत्रं हवी आहेत. मी आशा करतो की, मला आठवड्याभरात हे पैसे मिळतील.' असं संदीप पाटील म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहनही केलं की, 'पैसे सगळ्यांनाच लागतात. सर्वांना हा त्रास सहन करावा लागतो आहे. पण मी सर्वांना विनंती करतो की, सर्वांनी संयम ठेवावा. लवकरच याबाबत सरकार आणि आरबीआय नक्कीच तोडगा काढतील.' असंही पाटील म्हणाले.