Mumbai-Pune Air Quality Index : मुंबईतील (Mumbai) हवा मागील दोन दिवसांपासून अतिशय वाईट श्रेणीत मोडत आहे. पुढील दोन दिवस मुंबईचा एक्यूआय (Air Quality Index) 300 पारच राहणार, असा अंदाज हवा गुणवत्ता निरीक्षण करणारी संस्था सफरने (SAFAR) वर्तवला आहे. तर पुण्यातही (Pune) हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत असून इथला सरासरी एक्यूआय 215 च्या वर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदूषित राहणार असल्यांचा अंदाज सफरने व्यक्त केला.
श्वसनाचे विकार असलेल्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला
धुलिकणांचे प्रमाण वाढल्याने दोन्ही शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. पीएम 2.5 ची मात्रा अधिक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मुंबई, पुण्यातील हवेची पातळी धोकादायक बनत आहे. यामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे तसंच थकवा जाणवत आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी, शारीरिक परिश्रमाचे काम टाळावे, जास्त वेळ बाहेर राहणे टाळावे, सोबतच बाहेर पडत असल्यास मास्कचा वापर करावा, असा सल्ला दिला जात आहे.
चेंबूरमधील हवा सर्वाधिक प्रदूषित
मुंबईत चेंबूरमधील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आलं आहे. SAFAR संस्थेनुसार चेंबूरची हवा 332 च्या AQI सह अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे. यासोबतच माझगाव आणि मालाड इथल्या हवेची गुणवत्ताही अत्यंत खराब श्रेणीत आहे. कुलाबा, अंधेरी आणि नवी मुंबईची हवा अतिशय वाईट श्रेणीत असल्याचं समोर आलं आहे.
काय आहे मुंबईतील परिस्थिती?
मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआयमध्ये)
मुंबई (सरासरी) - 303 भांडूप - 239 कुलाबा - 316 मालाड - 303 माझगाव - 329 वरळी - 190 बोरीवली - 176 बीकेसी - 239 चेंबूर - 332 अंधेरी - 290 नवी मुंबई - 331
335 च्या AQI सह आळंदीची हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये
तर तिकडे पुण्यात आळंदीमधील हवा सर्वात जास्त प्रदूषित असल्याचं स्पष्ट झालं आहे. आळंदीची हवा 335 च्या AQI सह अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे. याशिवाय हडपसह, पुणे शहर इथल्या हवेची गुणवत्ता देखील खराब श्रेणीत आहे.
काय आहे पुण्यातील परिस्थिती?
हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआयमध्ये)
पुणे - 215 पाषाण - 118 शिवाजीनगर - 321 लोहगाव - 145 आळंदी - 335 कात्रज - 118 हडपसर - 262 भोसरी - 118 निगडी - 211 भूमकर चौक - 125 कोथरुड - 193
हेही वाचा
Mumbai Air Quality Index: मुंबईची दिल्ली होतेय का? वर्षभरात 280 दिवस मुंबईची हवा प्रदूषित