मुंबई : यंदा मुंबईतील माहिमच्या प्रसिद्ध दर्गा हजरत पीर मखदूम शाह बाबा यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रेवर करोनाचं सावट आहे. 120 वर्षात प्रथमच यावेळी माहिम दर्ग्याजवळ यात्रा भरणार नाही, तर उरुससुद्धा साधेपणाने साजरा केला जाणार आहे .


हजरत पीर मखदूम शाह बाबा यांचा माहीम इथला प्रसिद्ध दर्गा... दरवर्षी दर्गा परिसरात दहा दिवसांचा ऊरूस भरविण्यात येतो. या ऊरुसा निमित्ताने देशभरातील लाखो लोक माहीम दर्ग्यामध्ये येऊन मानाची सादर चढवित असतात. यावर्षी 29 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत हा उरूस भरविण्यात येणार होता. मात्र राज्यभरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उरूस प्रथमच साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.


दरवर्षी माहीम दर्गा परिसरात भरणारा उरूस हा सर्वसामान्यांसाठी आनंद देणारा उरूस ठरत असतो. कारण लाखो लोक दर्गा मध्ये दर्शनासाठी तरी येतातच, मात्र याच परिसरात लागणाऱ्या या यात्रेमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, खेळणी, मिठाई, अत्तर तसेच विविध वस्तू खरेदी करण्याची एक पर्वणी नागरिकांना मिळत असते. कोरोनामुळे ही यात्रा यंदा रद्द झाल्याने काही प्रमाणात या परिसरातील दुकानदार नाराज आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता याच्यावर दुसरा पर्याय नाही. याची तयारी देखील त्याने ठेवलेली आहे.


हजरत पीर मखदूम शाह बाबा यांच्या दर्ग्यामध्ये होणाऱ्या उरुसा संदर्भात राज्य शासनाने काही नियमावली आखून दिलेली आहे.




  1.  या दर्गा मध्ये मुंबई पोलीसांची पहिली मानाची चादर चढविण्यात येते. ही चादर वाजत-गाजत पोलीस आणि प्रशासन घेऊन येत असतं. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोजकेच पोलीस अधिकारी ठरलेल्या वेळेत चादर घेऊन दर्ग्यामध्ये चढवतील.

  2. राज्यभरातून साडे चारशे मानाच्या चादर दरवर्षी दर्ग्यामध्ये येत असतात. यंदा ही चादर घेऊन येणाऱ्या समित्यांना मोजके सदस्य घेऊन येण्याची सूचना देण्यात आलेली आहे.

  3. दर्ग्यात फुल, चादरी देणाऱ्या विविध समित्यांना दर्ग्यात येण्यापूर्वी ऑनलाइन बुकींग करावे लागणार आहे. तरच ते ठरलेल्या वेळी चादर चढवू शकतील.

  4. दर्ग्यामध्ये पूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. अत्यंत मोजके लोक या परिसरामध्ये उपस्थित राहणार आहेत.

  5.  दर्गा परिसरात कोणतेही स्टॉल्स आणि मनोरंजनात्मक खेळणी उभारण्यात येणार नाहीत.

  6. या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये नागरिकांनी दर्गा परिसरात न येण्याचा आवाहन दर्गा समितीने केलेले आहे.

  7.  घर बसल्या पीर बाबा मगदूम शहा यांचे दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.


दरवर्षी माहीमच्या दर्ग्यातील उरूस भरत असताना संपूर्ण भाविकांमध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये देशभरातील लाखो लोक दर्ग्यामध्ये येऊन पीर मगदूम शहा बाबांचे दर्शन घेत असतात. यंदा कोरोनामुळे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकशे वीस वर्षांची परंपरा मोडीत काढत यात्रा न भरण्याचा ऐतिहासिक निर्णय दर्गा कमिटीने घेतल्यानं त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.