मुंबई : पाकिस्तान कधीच भारताविरोधी अण्वस्त्र वापरणार नाही. कारण त्यांना माहित आहे की तेच नष्ट होतील. अण्वस्त्रामुळे भारताचं जितकं नुकसान होईल, त्याच्या दहापट नुकसान पाकिस्तानचं होईल, असे माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’ कार्यक्रमातील चर्चेत ते बोलत होते.


‘पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे का?’ या विषयावर ‘माझा विशेष’मधील चर्चेत माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस हेसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी भारत-पाकिस्तान संबंध आणि शस्त्रसाठा यासंबंधी महत्त्वपूर्ण विश्लेषण केले.

पाकिस्तानच्या अण्वस्त्र टाकण्याच्या धमकीला भारत भीत नाही, हे पाकिस्तानलाही माहित आहे, असेही अनिल टिपणीस म्हणाले.

“पाकिस्तानमधील सुशिक्षित लोकांना वाटतं की, भारताने पाकिस्तानविरोधात कधीही लढाई करु नये. शिवाय, पाकिस्तानी लष्करावरचा विश्वासही कमी झाला आहे.”, असे टिपणीस म्हणाले.

“पाकिस्तान भारताला कायमच घाबरत राहील. कारण भारताची तांत्रिक क्षमता प्रचंड आहे. शिवाय, भारताने इतर देशांच्या सैन्यासोबत सराव केले आहेत. त्यामुळे इतर देशांनाही भारताची ताकद माहित आहे. आपले टेक्निशियन्स, पायलट टॉप-क्लासचे आहेत.”, असे अनिल टिपणीस यांनी सांगितले.

आपल्या विश्लेषणाच्या शेवटी माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस म्हणाले, “आत्मविश्वास मोठी गोष्ट आहे. कोणतंही लढाऊ विमान असू द्या. मात्र, जोपर्यंत स्वत:वर विश्वास नाही, तोपर्यंत काहीच शक्य नाही. सैन्यातही आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.”