ठाणे: दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा दिवाळीत केवळ टिकल्या आणि लवंगीवर समाधान मानावं लागणार आहे. कारण की, ठाणे पोलिसांनी मोठ्या आवाजांच्या फटक्यांवर बंदी घातली आहे. तसे पत्रकच जारी करण्यात आले आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी यासंबंधी आदेश काढून मोठ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.
मोठ्या आवाजांंचे फटाके वाजविण्यास बंदी
आपटी बार, तडतड्या, उखळी बार आणि अॅटम बॉम्ब वाजविण्यावर ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. या फटाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घातक पदार्थ असतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होतं. त्यामुळे या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आकाशातून जाऊन फुटणाऱ्या मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत फटाके वाजविण्यास बंदी
तसेच रात्री 10 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान, कोणतेही फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसे सक्त आदेश पोलिसांनी दिले आहेत. तसेच रस्ता किंवा इमारतीपासून ५० फुटांच्या आत फटाके वाजवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. फटाक्यांसाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र रजिस्टर असणार असून २६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू होणार आहे.
याप्रमाणेच मोठ्या आवाजांचे फटाके विक्रेत्यांकडे असल्यास ते जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचेही आदेश पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, फटाक्यांच्या थेट उत्पादनांवरच बंदी घालण्यात यावी अशी अनेकांची मागणी आहे. जेणेकरुन असे आदेश पोलिसांनी द्यावे लागणार नाहीत.