ठाणे : कोकणातील महापुरामुळे सध्या भयंकर परिस्थिती निर्माण झाली असताना तिथे मनुष्य बळाची आणि अत्याधुनिक साधनसामग्रीची प्रचंड कमतरता जाणवू लागली आहे. मात्र, ही सर्व साधन सामग्री आणि ती वापरण्यासाठीची मनुष्यबळ मुंबई महानगर प्रदेशातील अनेक महापालिका जवळ उपलब्ध असल्याने, या महानगरपालिकाकडून आता विविध मदत पथके रवाना करण्यात येत आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका नवी मुंबई आणि पनवेल महानगर पालिकेला तातडीने अशी पथके आणि विविध साधन सामग्री तसेच अत्याधुनिक यंत्रे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने आज पहिले विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे मिळून एक पथक महाडकडे रवाना केले. 


रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी आज रवाना केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाडला रवाना होत आहेत. या विविध पथकातंर्गत आरोग्य पथक पाठविण्यात येणार असून या पथकामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके पाठविण्यात आली. या पथकांसोबत 10 हजार रॅपीड अँटीजन टेस्टींग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात आला. 


साफसफाई, फवारणीसाठी सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, फायलेरिया कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत 24 पंप, 4 स्प्रेईंग मशीन, 4 फॅागिंग मशीन, सोडियम हायपोक्लाराईड व फवारणीसाठी लागणारे सर्व रसायणे आदीसह सुसज्ज 90 कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले. तिथे असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 10 हजार लिटर्स पाण्याचा एक टॅंकर आणि स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा 10 हजार लिटर्स क्षमतेचा एक टॅंकर असे एकूण दोन टँकर पाठविण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे दोन ट्रक, रेशनिंग, किटस्, 5 हजार सतरंजीही पाठविण्यात आले. मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीमही रवाना होत असून या सर्व पथकांसोबत महापालिकेच्या 8 ते 9 मिनी बसेस, दोन डंपर, 2 ट्रक, 4 जीप आणि इतर साहित्य पाठविण्यात आले.