मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी मागणी करणारी घोषणा आज दादरमधल्या एका पुलावरून ऐकू येत होती. या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणारा श्याम गायकवाड हा कार्यकर्ता चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा देत होता.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी मागणी या तरुणाकडून करण्यात आली. सुमारे तासभर या तरुणाने पुलावर ठाण मांडली होती आणि पुलावरुन उडी मारण्याची धमकीही श्याम देत होता.
अखेर तासाभराच्या ड्राम्यानंतर पोलीस आणि अग्निशमनदलाची गाडी आली. मग भल्या मोठ्या शिडीद्वारे अग्निशमन जवान त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याला खाली उतरवलं. यावेळी त्याने राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही वाटली आणि अखेर त्याला पोलिसांनी अटकही केली.
अटक केल्यानंतर पोलीस त्याला माटुंगा पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि चौकशी केली. दुपारी साडे तीन वाजल्यापासून हा सर्व ड्रामा सुरु होता. त्यामुळे बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.
कोण आहे आंदोलन करणारा तरुण?
आंदोलन करणारा हा तरुण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील इसापूर गावचा आहे. दिग्रसमध्येही त्याने आधी पोलीस स्टेशनमधील टॉवरवर चढून अनेकदा आंदोलन केलं आहे. त्याने दिग्रसच्या तहसीलदारांना स्वत:सह कोंडून घेतलं होतं. 2012 मध्ये याने भाजपच्या तिकिटावर मांडवा गणातून पंचायत समितीची निवडणूक लढली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. हा तरुण मनोरुग्ण असल्याचं बोललं जातं.
आंदोलन करणाऱ्या तरुणाचं पत्र
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, दादरच्या पुलावर तरुणाचं आंदोलन
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
27 May 2018 06:39 PM (IST)
या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणारा श्याम गायकवाड हा कार्यकर्ता चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा देत होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -