ठाणे मनसे कार्यालयाच्या बाहेर काल भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते, जिल्हा आणि शहर अध्यक्ष एकमेकांना भिडले. एकमेकांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. इतकंच नाही तर चारित्र्यही काढलं गेलं. शेवटी पोलिसांनी आपला हिसका दाखवत सर्वांना पळवून लावलं.
काल झालेल्या वादानंतर आज मात्र मनसेने सर्व परवानग्या घेऊन पुन्हा एकदा स्टॉल उभा केल्याचा दावा केला आहे. सोबत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नगरसेविकेवर पैसे मागितल्याचा आरोप स्टॉलधारकाने केला आहे. यानंतर ताबडतोब भाजपच्या शहराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन या स्टॉलला कोणतीही परवानगी नसून पुन्हा पालिकेकडे कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितले. तसेच स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे यांनीही स्वतःवरील आरोप फेटाळले.
ठाणे महापालिकेने मनसेच्या आंबा स्टॉलला दिलेली परवानगी नाकारली असून त्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. तशी नोटीस देखील बजावली आहे. यावर मनसे पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
मनसे 17 तारखेला ठाण्यात मोठा मोर्चा काढणार आहे. मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मोर्चात संपूर्ण ठाण्यातील शेतकरी, आंबा विक्रेते आणि मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हा मोर्चा महापालिका प्रशासन आणि भाजपच्या विरोधात काढला जाणार असल्यामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे.
ठाण्यात भाजप आणि मनसेमध्ये झालेल्या या संघर्षाला येणाऱ्या निवडणुकीची किनार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यामुळे विष्णू नगरच्या रहिवाशांना नाहक त्रास झाला हे निश्चित.