भिंवडी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात काल मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन मंदिरातील 5 दानपेट्या फोडून दानपेटीतील 10 ते 12 लाख रुपयांची रोकड पळवली असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे. संतप्त ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ आज गाव बंद ठेवले आहे.


आज पहाटे तीनच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडेखोरांनी एका सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करुन देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील तीन आणि बाहेरच्या दोन अशा एकूण 5 दानपेट्या फोडून 10 ते 12 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे.

या घटनेमुळे वज्रेश्वरी गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांनी निषेध म्हणून आज संपूर्ण गाव बंद ठेवले आहे.

घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस उप अधीक्षक दिलीप गोडबोले यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली असून जवळपास 8 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

परंतु मंदिर व्यवस्थापकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच वज्रेश्वरीची यात्रा झाली होती. त्यामुळे दानपेटीत जवळपास 10 ते 12 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

VIDEO | भिवंडीतील वज्रेश्वरी मंदिरात मोठा दरोडा, लाखोंचा मुद्देमाल लंपास | भिवंडी | ABP Majha



यापूर्वीदेखील तीन ते चार वेळा मंदिराच्या दान पेटया फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दरोड्यामुळे आज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी भाविकांची गैरसोय होत आहे.