ठाणे : महाविकासआघाडीचं सूत पक्कं जुळल्याचं चित्र ठाणे महापालिकेतही दिसून आलं आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के पदावर विराजमान होत असताना तिथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडही पोहोचले. शिवसेना नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावरून त्यांनी महापौरांना शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादीनं नरेश म्हस्के यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता.


दरम्यान, महाविकासआघाडीबाबत सर्व निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासह अन्य विषयावर आम्ही बोलणं उचित नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाणे शहराच्या महापौरपदी नरेश म्हस्के विराजमान झाल्याबद्दल शिवसेनेचे विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षियांचे आभार मानले. सरकार स्थापनेबद्दल लवकरात लवकर निर्णय होईल. तसेच अडीच वर्ष मुख्यंमत्री या विषयावर उद्धव ठाकरे बातचित करत आहेत, आम्ही यावर बोलणं उचित नाही, असेही शिंदे म्हणाले. शिवसेना हा आदेशाने चालणारा पक्ष आहे, शिवसेनेला जाणीव आहे संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या दिल्या तरी कोणीही आमदार फुटणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

आज, ठाणे महापालिका सभागृहात शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान महापौरांच्या निवडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन नगरसेवक आणि नवनिर्वाचित महापौरांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार देखील केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक यांचे आभार मानले.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार देखील अर्ज दाखल करणार होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरुन राष्ट्रवादीने ठाणे महापालिका महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच असेल हे सिद्ध झालं होतं. अखेर शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची महापौरपदी तर पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.