ठाणे : ठाण्यातील किसननगर नंबर 2 येथे काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. सिनेमात घडावा तसा खुनाचा थरार काल (7 जानेवारी ) ठाण्यात पाहायला मिळाला. घराच्या संदर्भातील वाद इतका विकोपाला गेला की या वादात एकाची हत्या झाली तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. पण पोलीस शिपाई मुकुंद राठोड आणि सुनील धोंडे यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचला. सोबत त्या आरोपीला देखील आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त केले.
विजय सदन, किसननगर नं. 2 वागळे इस्टेट ठाणे येथे घराच्या जागेवरुन वाद सुरु असल्याचा फोन श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये आला. तोच पोलीस शिपाई मुकुंद राठोड आणि पोलीस शिपाई सुनील धोंडे यांनी घटनास्थळी घाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच विजय सदन या इमारतीतून एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत धावत पोलिसांकडे आली. त्या महिलेच्या गळ्यावर कोणी तरी धारदार शस्त्राने वार केला होता, त्यामुळे तिच्या गळ्यातून रक्त वाहत होते. या महिलेचा जीव वाचेल की नाही असं वाटत असतानाच पोलीस शिपाई मुकुंद राठोड यांनी ओढणीने त्या महिलेचा गळा बांधला आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर दुसरीकडे विजय सदन इमारतीतून अजूनही ओरडण्याचा आवाज येत होता. सुनील धोंडे यांनी इमारतीच्या आत धाव घेतली आणि त्यांनी पाहिले की आरोपी हातात चाकू घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देत होता आणि त्याच्या पायाजवळ एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जीव धोक्यात टाकून पोलीस शिपाई सुनील धोंडे आणि मुकुंद राठोड यांनी त्या आरोपीला पकडले आणि त्याच्या हातून चाकू हिसकावून घेतला. खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुरुषाला तपासले असता त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
यातील आरोपीचं नाव महेंद्र कर्डक असून त्याने ज्या महिला आणि पुरुषावर वार केले त्यांची नावे अनुक्रमे नीता कर्डक तर विजय कर्डक आहेत.
नीता ही आरोपी महेंद्र कर्डकचा भाऊ राजन कर्डकची पत्नी आहे. तर विजय कर्डक हा नात्याने महेंद्र कर्डकचा भाऊ लागतो. नीता कर्डक राहत असलेल्या घरावरुन महेंद्र आणि नीता यांचे वाद सुरु होते. काल हे वाद इतके विकेपाला गेले की नीता घराचा दरवाजा उघडत नाही म्हणून महेंद्र दार तोडून आत शिरला आणि नीतावर धारदार शस्त्राने वार करु लागला. निताच्या ओरडण्याचा आवाज ऐताच बाजूला असलेला विजय कर्डक नीताच्या मदतीला धावून गेला आणि त्याने महेंद्रला हटकले. पण महेंद्रला राग इतका अनावर झाला होता की त्याने त्याच्याजवळील शस्त्राने थेट विजयच्या पोटात भोसकले आणि त्याच्यावर वार केले. पोलिसांनी महेंद्रला अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
या घटनेत पोलीस शिपाई सुनील धोंडे यांच्या हुशारीने महिलेचा जीव वाचला त्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी सुनील धोंडे यांना कौतुकाची थाप देत त्यांचे अभिनंदन केले आहे.