ठाणे : ठाण्यातील तरुणाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वसीम रशीद खानचे एका तरुणीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप आहे.


वसीमच्या हत्येप्रकरणी अरशद अबुलहसन खान, विवेक सिकंदर यादव आणि रतनलाल उर्फ सोनू राजनाथ यादव या आरोपींना 31 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विवाहित असलेल्या वसीमचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, यातूनच त्याची हत्या झाल्याची माहिती आहे.

वसीम रविवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत ठाण्यातील नळपाडा भागातील धर्मवीरनगरच्या मैदानात बसला होता. त्यावेळी चौघांच्या टोळक्याने वसीमला जबरदस्त मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी दारुच्या नशेत त्याच्या गळ्यावर दारुची बाटली, चाकूने वार केले. अतिरक्तस्रावामुळे वसीमचा जागीच मृत्यू झाला.

मारहाणीच्या प्रकारानंतर वसीम बराच काळ घटनास्थळावर पडून होता. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चितळसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला स्थानिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पोलिसांनी वसीमच्या खिशात सापडलेल्या तरुणीच्या फोटोवरुन तुळशीधाम, सुभाषनगर परिसरात शोध घेतला. मात्र तरुणी धर्मवीरनगर परिसरात आढळली.

वसीमबाबत तिच्याकडे विचारणा केली असता, तो विवाहित असून त्याला दोन अपत्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तरुणी आणि वसीम यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या विवाहाला तरुणीच्या भावांचा विरोध होता.

पोलिसांनी अरशद अबुलहसन खान, विवेक सिकंदर यादव आणि रतनलाल उर्फ सोनू राजनाथ यादव यांना अटक केली. या आरोपींमध्ये तरुणीच्या दोन भावांचा समावेश असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा फरार आहे. तर अन्य दोन मित्रांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.