भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल करताना मी पहिलं, असं एका महिलेने सांगितलं होतं. त्यानुसार तक्रार दाखली केली. मात्र चौकशीतून अद्याप एकही पुरावा भिडे गुरुजींविरोधात मिळालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. याप्रकरणाची चौकशी सुरुच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार अटक करण्यात आली नाही, तर त्यांच्या अटकेसाठी राज्य सरकारने सर्व प्रयत्न केले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ''मिलिंद एकबोटे फरार होते, त्यांच्यासाठी पथकं तयार करण्यात आली होती. त्यांना अटक न करता चौकशी करा अशी कोर्टाची भूमिका होती. तर कस्टडीमधील चौकशी करायची अशी पोलिसांची भूमिका होती,'' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल भेट घेतली आणि या प्रकरणी भिडे गुरूजींच्या सहभागाचे पुरावे देतो असं सांगितलं. त्या पुराव्याचंही विश्लेषण केलं जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ही घटना गंभीर आहे. यामध्ये माझ्या कुटुंबातील व्यक्ती असली तरी मी सोडणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
''भीमा- कोरेगाव या ठिकाणी मोठया प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. वढू या ठिकाणी समाधी तोडल्याप्रकरणी बोर्ड लावण्यात आला. ही घटना घडल्यानंतर त्या गावाने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 'जय शिवाजी जय भवानी' अशी एका गटाची घोषणाबाजी सुरु होती. दुसऱ्या गटाला वाटलं की आपल्या विरोधात घोषणाबाजी करतात म्हणून त्यांनीही घोषणा देण्यास सुरवात केली. पोलिसांनी दोघांनाही बाजूला केलं. यात एका तरुणाची हत्या करण्यात आली. याच्या प्रत्येक क्लिप राज्य सरकार आणि पोलिसांकडे आहेत,'' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी 9 हजार 234 लोकांवर कारवाई झाली. हिंसाचारात 13 कोटी 80 लाख रुपयांचं नुकसान झालं, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
VIDEO : मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया