ठाणे : व्यापारासाठी दिलेले अडीच लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या 57 वर्षीय महिलेवर चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. फायबरच्या स्टीकने केलेल्या बेदम मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत.
ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे .
ठाण्यातील सावरकर नगर भागात राहणाऱ्या सावित्री विजय सिंह यांच्याकडून व्यापारासाठी शामू तिवारी यांनी अडीच लाख रुपये घेतले होते. रक्कम मागण्यासाठी वारंवार फोन केल्यानंतरही शामू तिवारी फोन उचलत नाहीत, तसंच प्रत्यक्ष गेल्यानंतर भेटत नाहीत, असं सावित्री यांनी सांगितलं.
फिर्यादी सावित्री विजय सिंह पैसे मागण्यासाठी रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विष्णूनगरमधील भक्ती मंदिर मैदान परिसरात असलेल्या तिवारीच्या कार्यालयात गेल्या. त्यावेळी शामू तिवारी नव्हते. मात्र शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्यांचा पुतण्या रमेश गिरी आणि त्याच्यासोबत काम करणारे दशरथ, मनोज आणि बाबाजी यांनी सावित्री सिंह यांना फायबर काठीने बेदम मारहाण केली.
फायबर काठीने सावित्री यांच्या कमरेवर, हातावर, पायावर डोक्यावर प्रहार करुन ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सावित्री सिंह यांना उपचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीत सावित्री यांच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत, तर हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात आरोपी शामू तिवारी, रमेश गिरी, मनोज, दशरथ आणि बाबाजी यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी शामू तिवारी हा अद्याप फरार असून नौपाडा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अडीच लाख परत मागणाऱ्या 57 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Apr 2018 06:32 PM (IST)
व्यापारासाठी दिलेले अडीच लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या 57 वर्षीय महिलेवर चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना ठाण्यात घडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -