नवी मुंबई : अजून अस्तित्त्वातही न आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं यावरुन सध्या वाद सुरु आहेत. रायगड जिल्ह्यातील हद्दीत विमानतळ उभं राहत असल्याने आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, आगरी-कोळी समाजासाठी आयुष्य वेचलेले दि बा पाटील तर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांची नावं देण्यात यावीत, अशी मागणी केली जात  आहे.

सिडकोच्या माध्यमातून पनवेल येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. 2300 हेक्टर जागेवर हे विमानतळ उभं राहत असून यासाठी 15 हजार कोटींवर खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विमानतळाच्या उभारणीसाठी युद्ध पातळीवर काम हाती घेतले आहे.

पण अजून एकही वीट रचली न गेलेल्या विमानतळाच्या नामकरणावरुन चांगलाच वाद सुरू झाला आहे. सिडको, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयात विविध नावांची मागणी करणारे पत्र देण्यात आली आहेत.

नवी मुंबई वसवण्यासाठी इथल्या आगरी-कोळी लोकांच्या जमिनी सिडकोने घेतल्या. मात्र त्यांना कोणताही मोबदला न दिल्याने दि बा पाटील यांनी रक्तरंजित लढा उभारुन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांचं नाव विमानतळाला द्यावं, अशी मागणी आगरी-कोळी युथ फाऊंडेशनने केली आहे .

दुसरीकडे रायगडचे लोकसभा-राज्यसभा खासदार, आमदार आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तर महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव विमानतळाला द्यावं, यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र त्याआधी विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांना पहिला न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.