ठाणे : विषारी किंवा बिनविषारी सापांना पकडणारे सर्पमित्र पाहायला मिळतात. मात्र पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात एक महिला दशकभरापासून कार्यरत आहे. ठाण्यातील मानसी नथवाणी ही सर्पमैत्रिण हे धाडस गेल्या दहा वर्षांपासून करत आहे.


ठाण्यातील उपवन परिसरात राहणारया मानसी नथवाणी या महिलेने विषारी सर्प पकडण्याबरोबरच प्राणीमित्र म्हणूनही ओळख मिळवली आहे. मानसीला तिची 13 वर्षांची मुलगी स्वरा नथवाणीही मदत करते. केवळ सापांची ओळख व्हावी, या उद्देशाने स्वरा आईसोबत हे साहस करते.

ठाण्यात पाचपेक्षा अधिक विषारी सापांच्या जाती मानसीने पकडल्या आहेत. सापाला पकडल्यानंतर व्यवस्थित हाताळण्याबरोबरच साप खेळणं नसून प्राणी असल्याचं ध्यानात ठेवा, असा मौलिक सल्लाही दिला आहे. ठाण्यातील उपवन तसेच घोडबंदर परिसरात त्यांनी 250 हून अधिक साप आणि नाग पकडून त्यांना जीवदान दिलं आहे.

ठाण्यात कोब्रा, तसंच सापाच्या फुरसे, मण्यार या जातीचे साप जास्तीत जास्त आढळून येतात. असे साप पकडत असताना योग्य काळजी घेतली पाहिजे, असं त्या सांगतात.

घर आणि साप पकडण्याचा छंद, तसंच व्यवसाय करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याची मानसी यांनी सांगितलं. ठाणे शहरात केवळ त्या एकट्याच असून पालघर आणि पुण्यात देखील अशा सर्पमैत्रिणी असल्याचं मानसी यांनी सांगितलं. महिला दिनाच्या निमित्ताने मानसी यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरो, ही अपेक्षा